Saturday, September 7, 2013

गाव सोडल्यानंतर..

अबोली, तेरड्याची फुले दिसेनाशी झाली. जखमेवर आता टणटणीच्या पाल्याऐवजी डेटौल लावायाला लागलो. सीताफळ, पेरू आजकाल अक्षरशः विकत घेऊन खातो. चिंच हा प्रकार माझ्यासाठी इतिहास जमाच झालाय.
गायीवासरांच्या पाया पडून काळ लोटला की. मनात आज भीती वाटते की चुकून कधी सायकल चालवायची वेळ आली तर जमेल ना?
संक्रांतीचे तिळगुळ, दसऱ्याची आपट्याची पाने इकडे आल्यापासून घेतली नाही. वर्गणीसाठी आता दारोदारी जाव लागत नाही. आठवडी बाजारात घासाघाशीची मजा किंबहूना वावच राहिली नाही.
गोट्यांचे रिंगण, बाभळीचा दांडू, मिसळीतला रस्सा, मुंबई चौफेरची शब्दकोडी, चल्लस ७ चे चिंचुके, घराजवळच मोगऱ्याच झाड, हौदातल पाणी, नाक्यावरची भेळ सगळ काही मागे राहिलं..
आणि सर्वात महत्वाच, झोपेनंतर आयुष्याचा सर्वाधिक वेळ जिथे गेला तो क्रिकेटचा खेळ, ते मैदान, ते लंगोटी यार, ती सकाळ, ती दुपार, ती संध्याकाळ आणि ते दिवस सगळ काही खरचं मागे राहूनच गेल..