Thursday, May 1, 2014

आणि फुलपाखरांचे रंग हरपले..

दिवस असतील २०११ श्रावणातले. मधेच हलक्या धारा आणि मधेच इंद्रधनुच्या नाजूक रेषा. शोकेसवर एक भारदस्त टीव्ही आणि त्यावर रेडीओ. दुपारची २.३० ची वेळ. विविधभारतीवर आप की फर्मायीश संपून जुन्या गाण्याचा कार्यक्रम चालू होता. कधी शम्मी कपूरच “दिवाना हूआ बादल” तर कधी (भारी दात असलेल्या) मोसमी चटर्जीच “रिमझिम गिरे सावन” (अमिताभ चाहत्या वर्गाची माफी, उल्लेख टाळल्याबद्दल) लागायचं. मागच्या खोलीत आई झोपलेली असायची. घराबाहेर सीताफळाच्या झाडावरून पाणी ओझरत होत. मातीचा अगदी केशवसूत, बालकवी, आणि नाना कवींनी रंजीत केलेल्यासारखा सुगंध दरवळत होता. अचानक आई उठायची. मग “सखी सहेली” सुरु होईपर्यंत त्या काळची गाणी किती सुमधुर यावर सखोल चर्चा. चहा मध्ये “सपट होटेल मिक्शर” सोडताच आईची तलफ वाढायची. तेवढ्यात तुषार, अमोल किंवा संदीप चा फोन येणार. गिरणीवर ये किंवा खाली मुक्तेश्वरा कडे ये. मग अंधार पडेपर्यंत किंवा पाऊस खेळखंडोबा करेपर्यंत विश्वसुखात आम्ही रमायचो. दिवेलागणी नंतर थोड्या वेळात आसावरी रडायची आणि महाराष्ट्राची महासिरीयल कोणत्या तरी कुळाची वधू यायची. जेवण झाल्यावर ते त्या वेळी निखिल वागळे येईपर्यंत “आजच्या सवालावर” यथेच्च चर्चा आम्ही घडवून आणायचो, भावड्याच्या टपरीवर.. फरक एवढाच, आमच्या मध्ये त्या काळचा अरविंद सावंत (सर्वसमावेशक पक्षाचे प्रवक्ते, तेव्हाचे..आता सावंतच आहे पण कोणी दाढी करून आलेला, भारत-रत्नाशी साधर्म्य असलेला येतो) नसायचा. माझी भूमिका म्हणजे सरसंघचालक भागवत यांसारखी. बघता बघता रात्र संपायची. त्यावेळी सुद्धा सेट max वर सूर्यवंशम, इंगर्जी वाहिन्यांवर आईसएज ‘च’ बहुदा चालू होता. आठवडा असाच संपायचा. सोमवारी सकाळी सकाळी ७.१० च्या अर्थात ७.३० ला येणाऱ्या पंचवटीने पुन्हा मुंबापुरी गाठायची.
आज चैत्र २०१४. ४ मांसात श्रावण लागेल. इथे विविधभारती सुद्धा लागत नाही आणि FM वर फ़क़्त “अब की बार”, “हर हात क शक्ती” ऐकू येत. सीताफळाच झाड मिळेपर्यंत MH370 सापडेल. अमोल, तुषार, संदीप यांचे फोन आता येत नाही. सपट ची जागा सोसायटी ने घेतली. निखिल वागळे तर आता डोक्यात जातो. लग्नाच्या इतक्या गोष्टी टीव्ही वर यायला लागल्या आहेत की विसर पडला आहे, ही तीच वाहिनी ना जिने ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘नक्षत्रांचे देणे’ दिले. खरचं रंग हरवले.