Saturday, March 28, 2015

मुक्तपीठ २: “सजीव”

लाल पिवळ्या उजेडात वाहनांची वर्दळ पुढे सरकत होती. उगाच अस्तित्व टिकवून असलेला तो निष्पर्ण वृक्ष अक्राळ विक्राळ सावल्या पसरवत होता. मुंग्या सारख आपल अस्तित्व, पण त्या उंच वृक्षाचा तोच तोच सजीवपणा मला तेव्हा खूप काही सांगून गेला. शर्यत करून ठेवलय आयुष्य आपल. मुळात घड्याळ ही संकल्पना जन्माला यायलाच नको होती. त्या पक्षांना कस तेवढचं कळत की गगनराज भास्कर मावळले की परत फिरायचे? या गडकरींनी तो “तळीराम” आणि त्या तेंडूलकरांनी हा “सखाराम” रेखाटले, पण कोणी त्यांना तसे केले? मुळात एखाद्या गोष्टीसाठी अमूल्य वेळेचे मुल्यांकन करणे हा न्यायचं मला पटत नाही. मुलभूत गरजा पूर्ण झाल्या की पुरे असतच की. खरंच, मानवी (Human) मोड हरवलाय. लहानपणापसून २२-२४ इंची सायकल द्या, कशाला उंचीसाठी शास्त्रज्ञांचे पुरावे? विरोधाभास तर इतके झाले, शाळेत जाताना रस्ता दोन्ही बाजूंना बघून ओलांडायचो, आता त्याचे नियम बनले.

आज काल तर त्या म्हशींच्या पाठीवर बसणाऱ्या बगळ्याचा सुद्धा complex येतो. स्वच्छंदी या शब्दाचा अर्थ दिवसेंगणिक, व्यक्तिपरत्वे, जागेनुसार, नात्यांसाठी आणि दाखवण्यापुरता बदलत जातो. का? एवढ्या dependancy कश्या आल्या? बाभळीचा दांडू खुर्पीने सालणाऱ्या हाताला “excel” मध्ये कशी गोडी लागणार? आता संकरित भेंडी देखील तेच देणार आणि त्यात घालायचा मसाला सुद्धा तेच देणार, चांगली चव सुद्धा त्यांचा चेहराच सांगणार. निर्णयक्षमते-वर प्रश्न विचारण्याचा हक्कचं का द्यावा?
गुलझारांनी सांगेपर्यंत सजीवपण न समजण्याइतके हतबल का झालेलो? समाधान हे एकच परिमाण आहे. आर्थिक, सामाजिक, मानसिक हे तर धंद्या वाल्यांचे मुलामे आहेत. पक्ष्यांच गाण गोड भासतं हे मुळात त्यांच्या आवाजापेक्षा त्यांच्या जगण्याच्या शैलीच श्रेय आहे. तेच पक्षी उद्या या निष्पर्ण वृक्षांच्या फांद्यांवर बसून सजीवतेच जाणते दर्शन देतील आणि मी (आपण?) नेहमीप्रमाणे स्वगत करत धावत राहीन..स्थैर्यासाठी..जीवनासाठी..!!

Friday, December 5, 2014

“कोलंबस, केप ऑफ गुड होप आणि अमेरिका..”

सदर शीर्षकाचा आणि खालील लेखाचा तसा काही एक संबंध नाही. अर्थात माझ्या कल्पनेत, उपमेत हे बसले म्हणून..
मराठी रंगभूमी. तथाकथित, स्वयंघोषित राजकीय, चित्रपट समीक्षकांचा आवडतीचा विषय. त्याच पंक्तीतल्या ‘क्ष’ नावाच्या व्यक्तीने असाच आपल्या कधीही न भेटलेल्या फेसबूकवरिल आंधळ्या अनुयायांसमोर एक २५० शब्दांचा लेख प्रस्तूत केला. अर्थातच विषय बहुसंख्य मराठी जनसमुदायाला आवडेल, पटेल असाच होता. विषयाची एक बाजू होती, मराठी सिने अभिनेत्यांनी हिंदी मध्ये केलेल्या दुय्यम भूमिका ज्याच्याशी मी पण सहमत आहे आणि दूसरी बाजू होती मराठी आणि दक्षिणात्य चित्रपटांची केलेली तूलना, अर्थात जी देखील सगळ्यांना पटणारी पण तांत्रिक दृष्ट्या कधीही न सिद्ध होणारी..

प्रेमाचे लव्हाळे कविता आठवते का? एवढ्या वादळात, पावसात, लाटांत सुद्धा ते आपले अस्तित्व टिकवून होते.. चित्रपट हा समाजाचा, सामाजिक चळवळीचा आरसा असावा हा मराठीचा नेहमीचा अट्टहास. पण कल्पनेवर चित्र उभे करणे म्हणजे चित्रपट ही जनमाणसात असलेली आणि चूकीची नसलेली समजूत. मुळातच संस्कारक्षम, मार्मिक आणि विस्तृत दर्शन करणारी कला उभी करणे ही मराठी आणि बंगाली रंगभूमीची ओळख. बंगाली सिनेमा या वास्तववादी विषयांसोबत पुढे गेला सुद्धा. मराठी दिग्दर्शक मात्र तेथेच अडकून राहिला, किंबहूना त्याने त्या वास्तवाच एक वेगळ विश्व उभे केलं, त्यालाच आपण अमेरिका म्हणूया. विषयांची कमतरता या प्रांतात मुळीच नव्हती, नाही आणि नसणार.

देवराई, पूणे ५२ बघितल्यावर स्क्रीझोफेनिया सारख्या विषयांवर इतकी गंभीर आणि बोलकी creativity होणार नाही, सामना, वजीर, सिंहासन राजकारणाचे उत्तम नमूने. श्वास मधली भावनांची जुगलबंदी; नितळ मधले समाजभान; देऊळ, एलिझाबेथ एकादशी मधला अध्यात्म; गाभ्रीच्या पावसातली विदारकता; डोंबिवली फास्ट मधली तळतळ; जोगवा, प्रेमाची गोष्ट, मुंबई-पूणे-मुंबई मधल तरुणाईला आवडणार निरपेक्ष प्रेम; बालक पालक मधली जटिलता; येलो मधला दुर्दम्य आशावाद; बालगंधर्व, आमटेमधला दृढ निश्चय; सुखांत मधली अगतिकता; पिंजरा मधले गूढ नाते आणि असे अनेक..

लिहायला गेलो, संशोधन केलं (अर्थात संशोधन करायला लागणे यात आपल अपयश आहे) तर खूप खोल, अथांग सागर आहे, अष्टगंधित माती आहे आणि विहार करायला भव्य आकाश.. समृद्धता पैश्यात, व्यवहारात मोजाल तर दक्षिणात्य सिनेमा उजवा आहे हे मान्य. पण विषयांतील विविधता, आणि एकरूप होऊ इतकी सहजता या शर्यतीत कदाचित आपण खूप सरस आहोत. गरज आहे एका ‘होप’ ची, Branding ची, आणि Marketing ची. इथे ‘कोलंबस’ हा व्यक्तीसापेक्ष नसून तुम्ही, आम्ही हा समाज आहोत. २०० रुपये देऊन चेन्नई एक्स्प्रेस बघतात आणि इतर असले भंपक टोचण देणार नाहीत.. वेळेनुसार प्रगल्भ समाज तयार होतो हे २०१४ च्या निवडणुकीच्या निकालांनी दाखवले आहेच, रंगभूमी बाबत सुद्धा ते घोडामैदान दूर नाही.

आणि शेवटी त्या ‘क्ष’ व्यक्तीला, जनसमुदायाला आणि माझ्यासारख्या मोजक्या लोकांना
“चला उभारा शुभ्र शिडे ही गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तूला पामराला..”

Thursday, May 1, 2014

आणि फुलपाखरांचे रंग हरपले..

दिवस असतील २०११ श्रावणातले. मधेच हलक्या धारा आणि मधेच इंद्रधनुच्या नाजूक रेषा. शोकेसवर एक भारदस्त टीव्ही आणि त्यावर रेडीओ. दुपारची २.३० ची वेळ. विविधभारतीवर आप की फर्मायीश संपून जुन्या गाण्याचा कार्यक्रम चालू होता. कधी शम्मी कपूरच “दिवाना हूआ बादल” तर कधी (भारी दात असलेल्या) मोसमी चटर्जीच “रिमझिम गिरे सावन” (अमिताभ चाहत्या वर्गाची माफी, उल्लेख टाळल्याबद्दल) लागायचं. मागच्या खोलीत आई झोपलेली असायची. घराबाहेर सीताफळाच्या झाडावरून पाणी ओझरत होत. मातीचा अगदी केशवसूत, बालकवी, आणि नाना कवींनी रंजीत केलेल्यासारखा सुगंध दरवळत होता. अचानक आई उठायची. मग “सखी सहेली” सुरु होईपर्यंत त्या काळची गाणी किती सुमधुर यावर सखोल चर्चा. चहा मध्ये “सपट होटेल मिक्शर” सोडताच आईची तलफ वाढायची. तेवढ्यात तुषार, अमोल किंवा संदीप चा फोन येणार. गिरणीवर ये किंवा खाली मुक्तेश्वरा कडे ये. मग अंधार पडेपर्यंत किंवा पाऊस खेळखंडोबा करेपर्यंत विश्वसुखात आम्ही रमायचो. दिवेलागणी नंतर थोड्या वेळात आसावरी रडायची आणि महाराष्ट्राची महासिरीयल कोणत्या तरी कुळाची वधू यायची. जेवण झाल्यावर ते त्या वेळी निखिल वागळे येईपर्यंत “आजच्या सवालावर” यथेच्च चर्चा आम्ही घडवून आणायचो, भावड्याच्या टपरीवर.. फरक एवढाच, आमच्या मध्ये त्या काळचा अरविंद सावंत (सर्वसमावेशक पक्षाचे प्रवक्ते, तेव्हाचे..आता सावंतच आहे पण कोणी दाढी करून आलेला, भारत-रत्नाशी साधर्म्य असलेला येतो) नसायचा. माझी भूमिका म्हणजे सरसंघचालक भागवत यांसारखी. बघता बघता रात्र संपायची. त्यावेळी सुद्धा सेट max वर सूर्यवंशम, इंगर्जी वाहिन्यांवर आईसएज ‘च’ बहुदा चालू होता. आठवडा असाच संपायचा. सोमवारी सकाळी सकाळी ७.१० च्या अर्थात ७.३० ला येणाऱ्या पंचवटीने पुन्हा मुंबापुरी गाठायची.
आज चैत्र २०१४. ४ मांसात श्रावण लागेल. इथे विविधभारती सुद्धा लागत नाही आणि FM वर फ़क़्त “अब की बार”, “हर हात क शक्ती” ऐकू येत. सीताफळाच झाड मिळेपर्यंत MH370 सापडेल. अमोल, तुषार, संदीप यांचे फोन आता येत नाही. सपट ची जागा सोसायटी ने घेतली. निखिल वागळे तर आता डोक्यात जातो. लग्नाच्या इतक्या गोष्टी टीव्ही वर यायला लागल्या आहेत की विसर पडला आहे, ही तीच वाहिनी ना जिने ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘नक्षत्रांचे देणे’ दिले. खरचं रंग हरवले.

Saturday, September 7, 2013

गाव सोडल्यानंतर..

अबोली, तेरड्याची फुले दिसेनाशी झाली. जखमेवर आता टणटणीच्या पाल्याऐवजी डेटौल लावायाला लागलो. सीताफळ, पेरू आजकाल अक्षरशः विकत घेऊन खातो. चिंच हा प्रकार माझ्यासाठी इतिहास जमाच झालाय.
गायीवासरांच्या पाया पडून काळ लोटला की. मनात आज भीती वाटते की चुकून कधी सायकल चालवायची वेळ आली तर जमेल ना?
संक्रांतीचे तिळगुळ, दसऱ्याची आपट्याची पाने इकडे आल्यापासून घेतली नाही. वर्गणीसाठी आता दारोदारी जाव लागत नाही. आठवडी बाजारात घासाघाशीची मजा किंबहूना वावच राहिली नाही.
गोट्यांचे रिंगण, बाभळीचा दांडू, मिसळीतला रस्सा, मुंबई चौफेरची शब्दकोडी, चल्लस ७ चे चिंचुके, घराजवळच मोगऱ्याच झाड, हौदातल पाणी, नाक्यावरची भेळ सगळ काही मागे राहिलं..
आणि सर्वात महत्वाच, झोपेनंतर आयुष्याचा सर्वाधिक वेळ जिथे गेला तो क्रिकेटचा खेळ, ते मैदान, ते लंगोटी यार, ती सकाळ, ती दुपार, ती संध्याकाळ आणि ते दिवस सगळ काही खरचं मागे राहूनच गेल..

Tuesday, February 21, 2012

पहिला ब्लॉग लिहिताना..

पहिला ब्लॉग..
खूप काही अध्यात्मिक, वैचारिक, विनोदी लिहिण्यापेक्षा आज, आत्ता या क्षणाला काय वाटत तेच मांडतो..
लहानपणी, शाळेत गणितातील नवीन प्रकार शिकल्यावर त्याचे प्रोब्लेम सोल्व झाल्यावर जसा आनंद व्हावा तसला आनंद झाला. खूप लोकांचे ब्लॉग वाचले, वाचतो, वाचेन. नेहमी वाटायचं त्यांना किती लोक फॉलो करतात, त्यांच्या ब्लॉग वर प्रतिक्रिया देतात, पसंतीची पावती देतात. आपणही असा काही प्रयत्न करावा.
एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी अलंकारिक शब्दांचा वापर करण्याची सवय खूप मुलांमध्ये असते. कदाचित यापुढे ब्लॉग लिहिताना मी देखील ती आत्मसाद करेन.